
चंद्रपूर : दि . २२/०५/ २०२६ घुग्घूस शहरातील भीषण पाणीटंचाई आणि मूलभूत समस्यांकडे साफ दुर्लक्ष करून, जनतेच्या तब्बल २० लाख रुपयांच्या कर रुपी निधीची उधळपट्टी करत गोव्याला मौजमजा करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सत्ताधारी नगरसेवकां विरोधात आज घुग्घूस शहरात जोरदार राजकीय भडका उडाला.
घुग्घूस नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व उप-नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवक शासकीय पैशातून ‘गोवा वारी’वर गेल्याचा थेट आरोप करत आज, शुक्रवार दि. २२ मे रोजी सकाळी भाजपा नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र ‘गो गोवा आंदोलन’ केले.
या आंदोलनादरम्यान संतप्त भाजपा लोकप्रतिनिधींनी चक्क नगरपरिषदेच्या आवारात बाहेर वापरण्याच्या पाण्यात अंघोळ करून सत्ताधाऱ्यांचा आगळावेगळा निषेध नोंदवला.
आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे नगरसेवक विवेक बोढे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. प्रशिक्षणाच्या नावाखाली केवळ मौजमजा आणि शासकीय निधीची लूट करण्यासाठीच ही गोव्याकडे झेप घेण्यात आली आहे, असा घणाघात त्यांनी केला. गेल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्षांची कॅबिन बंद असल्याने सामान्य जनतेची शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. “विकास गेला खड्ड्यात आणि हे चाललेत जनतेच्या पैशाने गोव्याला,” अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
नगरसेवक बोढे यांनी पुढे बोलताना म्हणाले की, भीषण उन्हाळ्यात संपूर्ण शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना, घुग्घूस शहराचे स्वयंघोषित ‘वॉटरमॅन’ आणि उप-नगराध्यक्ष राजुरेड्डी हे सुद्धा जनतेला वाऱ्यावर सोडून गोवा वारीवर जातात, हे या शहराचे मोठे दुर्दैव आहे, अशी चपराक त्यांनी लगावली. शहरात नागरिकांच्या नळाला पाणी नाही, शुद्ध पाण्याचे आरो (RO) प्लांट बंद पडले आहेत, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत आणि रात्रीच्या वेळी शहरात पथदिवेही लागत नाहीत; अशा गंभीर परिस्थितीत काँग्रेसच्या नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, उप-नगराध्यक्ष राजुरेड्डी व इतर सत्ताधारी नगरसेवक मात्र जनतेच्या घामाच्या पैशावर गोव्यात ऐश करत असल्याचा सनसनाटी आरोप यावेळी करण्यात आला.
सत्ताधाऱ्यांचा हा ‘गोवा पॅकेज’ सर्वसामान्य नागरिकांच्या घरटॅक्स, पाणीटॅक्स, नाली व सिमेंट रस्त्यांचा निधी, आणि अगदी गरीब, अपंग व निराधार योजनांच्या पैशांमधून वळवण्यात आल्याचे बोलले जात आहे. ‘नगरपरिषद खर्चाने’ आणि ‘विकास निधी’च्या नावाखाली स्वतःची हौस भागवणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी जनतेचा विश्वासघात केल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या आक्रमक आंदोलनात भाजपा नगरसेवक विवेक बोढे‘ भाजपा शहर अध्यक्ष संजय तिवारी, गटनेत्या मिना मोरपाका, स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नगरसेवक आशिष माशीरकर, नगरसेविका वैशाली ढवस, मधू तिवारी, तसेच भाजपचे अमोल थेरे, राजकुमार गोडसेलवार, संतोष नुने, गणेश शेंडे, धनराज पारखी, बबलू सातपुते, सुरेंद्र जोगी, संजय भोंगळे, रत्नेश सिंग,गणेश कुटेमाटे, साजन गोहणे,स्वप्नील वाढई, सचिन कोंडावार, पुजा दुर्गम,उषा आगदारी , मीना बेगम, असगर खान, उमेश दडमल, विशाल दामेर, मधुकर धांडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व संतप्त नागरिक उपस्थित होते.
या आंदोलनामुळे घुग्घूसमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, या ‘गोवा वारी’च्या खर्चाचा हिशोब देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.