
चंद्रपूर : मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी साहेब, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे, अंमली पदार्थ विक्री व तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत दिनांक ०२/०६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाला एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक ०२/०६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक चंद्रपूर शहर परिसरात अवैध धंदे, अंमली पदार्थ विक्री व जुगार प्रतिबंधक कारवाईकामी पेट्रोलिंग करीत असताना, पथकाला खात्रीशीर गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार (रा. नागपूर) हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या होंडा अमेझ कार क्रमांक एम. एच. ४९ एफ. १५६९ मधून नागपूर येथून भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित एम.डी. (मेफोड्रॉन) ड्रग्ज पावडर विक्रीकरिता घेऊन येणार आहे.
सदर माहिती तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेवरून एन.डी.पी.एस. कायद्यानुसार रीतसर कायदेशीर परवानगी मिळवून, दोन खाजगी पंचांना पाचारण करून, फोटोग्राफर व अधिकृत वजनमाप करणाऱ्यास डिजिटल इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यासह सोबत घेऊन नागपूर-भद्रावती रोडवरील जमघट हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला.
दिनांक ०३/०६/२०२६ रोजी रात्री ००:३५ वाजताच्या सुमारास बातमीतील वर्णनाची पांढऱ्या रंगाची कार हॉटेल जमघट समोरून युटर्न घेऊन खुल्या जागेत थांबली. पथकाने तात्काळ कारची नाकेबंदी करून चालकास ताब्यात घेतले. त्याची ओळख विचारली असता त्याने आपले नाव अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार (वय ४० वर्ष, रा. तुकडोजी चौक, नागपूर) असे सांगितले. राजपत्रित अधिकारी श्री. अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक) यांच्या समक्ष कारची व आरोपीची कायदेशीर झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून १६८.९४ ग्रॅम एम.डी. (Mephedrone) ड्रग्ज पावडर (किंमत ₹८,५०,०००/-) व वाहतुकीसाठी वापरलेली होंडा अमेझ कार असा एकूण १४,११,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे आरोपीविरुद्ध कलम 8 (c), 22(c), 29 एन.डी.पी. एस. (NDPS) ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपानी साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांच मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांच नेतृत्वात पोउपन कि विनोद भुरले, पोउपिन सुनिल गौरकार, पोलीस स्टॉफ पोहवा / सुभाष गोहोकार, पोहवा / सतिश अवथरे, पोहवा / रजनिकांत पुट्ठावार, पोहवा / दिपक डोंगरे, पोहवा / इमान खान, पोअं/हिरालाल गुप्ता, पोअं/ किशोर वाकाटे, पोअं/ शशांक बदामवार, सर्व स्थानिक गुन्ह शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.